Saturday, 16 April 2016

ममतेच्या पंखाखाली


ममतेच्या पंखाखाली

               

घरातील सर्व निर्जीव वस्तू गपचूप आपापल्या भूमिका बजावत आहेत. वाक्य न मिळालेल्या अभिनेत्याप्रमाणे  त्यांचा उत्साह सुद्धा आटला आहे. वाऱ्याने चेतवल्यामुळे खिडकीचा परदा अधिकची हालचाल करत आहे. सूर्याच्या प्रकाशासोबत तह करून स्वतःच्या रंगाचा प्रकाश त्याने संपूर्ण खोलीत पसरवला आहे. अशी हि सुस्तावलेली सकाळ थेट सूर्य पाहिल्याशिवाय आळस हि देणार नव्हती.
विक्रम फणीने केस विंचरून आपल्या व्हीलचेअरची चाके ढकलत किंचित सुजलेल्या डोळ्यांसोबत खिडकी समोर आला आणि त्याने पडदा एका हाताने सरकवून उन्हाला आत येऊ दिले. देवघरात समई लावल्यागत खोली प्रकाशमय झाली. उदास दिसणारे नट टवटवीत चेहरे करून एकमेकांशी मुकसंवाद करू लागले. विक्रमच्या पापण्यांनी डोळ्यांना पांघरले, विक्रम खूप वेळ असाच डोळ्यांना उब देत खिडकी समोर बसलेला. 
स्वयंपाकगृहातील कामे आटपून विक्रमची आई विक्रमच्या मागे काहीतरी काम घेऊन बसली. विक्रम हळू हळू डोळे उघडतो, सूर्यप्रकाशाच्या आलिंगणाने त्याचे शरीर उबदार झाले असते. सूर्य आता बऱ्यापैकी वर गेला आहे; डोळ्यासमोर आहे निळे अवकाश त्यात एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी आलेले ढग. विक्रमला या दृश्याचा मोह आवरत नाही. तो स्वतःचे पंख खोलून खिडकी बाहेर झेप घेतो आणि वर वर ढगांच्या दिशेने उडू लागतो. गार वारा त्याच्या कानाजवळून जाताना त्याला गुदगुल्या करत होता. त्याने घातलेल्या पॅन्ट चे टोक आत गुढग्या खालचे पाय नसल्याने नुसतेच फडफडत होते. पंखांच्या बळावर विक्रमने वेग धरला होता. आता तो ढगांच्या वर आला होता, विविध विषयांची पुस्तके खगाप्रमाणे थवा करून उडत होती. ढगांच्या एका टेकडीवर एक तलाव होते. खूप मोठे. त्यावरून उडताना स्वतःचे प्रतिबिंब पाहताना त्याला फार गम्मत वाटली, पाण्यात एक गरुड पोहतोय असे त्याला वाटले पण लग्गेच कळाले कि हे तर माझेच माझ्या पंखांसोबतचे प्रतिबिंब आहे. पुढे एक चमचमती वाटिका दिसली ज्यात कोणत्याही रोपाला, त्याच्या फुलाला रंग नव्हता ते पारदर्शक होते पण सूर्यप्रकाश त्यामधून जाता ठिकठिकाणी सप्तरंगाचे सडे पसरले होते. पिंजलेल्या कापसासारखे श्वेत मुलायम ढग पंख फडफडता दूर होत ,अशा ढगात आर पार विहार करण्यात त्याला फार मजा वाटत होती, एकदा त्या सफेद ढगात शिरलो कि कुठून आणि केव्हा बाहेर निघणार हे त्याला माहित नव्हते यातच त्या खेळाची गम्मत होती.

ज्या लयीत तो ढगात भ्रमण करत होता त्याच लयीत तो आपल्या खोलीत मान फिरवत आहे. मागून आईचा आवाज आला "विक्रम अभ्यास करायला जा". विक्रमने डोळे उघडले आकाशाकडे पहिले मग स्वतःच्या पायांकडे पहिले, स्मित हास्य करत स्वतःलाच म्हणाला "छान कल्पना करतोस" आणि व्हीलचेअरची चाके ढकलत स्वतःच्या खोलीत निघून गेला. आई आपल्या कामात मग्न आहे, एकाग्र आहे. ती तिचे लक्ष विचलित होऊ देऊ इच्छित नाही कारण तिला लवकरात लवकर ती विणत असलेले 'पंख' तयार करून विक्रमला द्यायचे आहेत.ते पंख ज्यांचे स्वप्न तो पाहतो. असे पंख जे त्याच्या लाचारतेला खोडून टाकतील. त्याची मान, त्याच्या आकांक्षेसारखी सदा वर राहो. असे सक्षम पंख आईने विक्रमसाठी विणायला घेतले, यात फार मेहनत आहे, फार कष्ट आहे पण आई विक्रमचे ते पंख त्याला देऊ इच्छिते

यासाठीचे सारे प्रयत्न आई घेणार. ते पंख वीणून विक्रमला देणार.

Saturday, 12 March 2016

अंधार

अनेकदा आपण कोणासाठीतरी जगत असतो. आपले वागणे, बोलणे एकूणच वर्तन हे परिस्थिती नुसार आपल्या कडून रचले गेलेले असते. अशा रचलेल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे पालन आपण लागोपाठ करतो आणि ते रचलेले व्यक्तिमत्व हिच आपली ओळख बनून जाते.
इतरांसाठी तसेच आपल्यासाठी सुद्धा...
आणि ती ओळख आपण नकळत फार अभिमानाने मिरवतो सुद्धा.
यावर आधारित एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. वाचून तुमचे मत जरूर कळवा.

-अंधार मी आहे

श्रेष्ठ मी उत्कृष्ठ मी
महान मी आहे
सूर्यप्रकाशात फिरणारा
अंधार मी आहे

पूज्य मी सर्वत्र सदा
सम्राट मी आहे
यशोद्यानी जायची
वाट मी आहे

माझ्या पायी सृष्टी सारी
सारा जहान आहे
सूर्यप्रकाशात फिरणारा
अंधार मी आहे

माझी दृष्टी माझी बुद्धी
माझा हा संसार आहे
काळालाही चाल कळेना
मी गतिमान आहे

विश्रांती मी घेतली
धाव माझी रोखून
भेटलेलो मी स्वतःला
एकदा चुकून

डोळ्यात पाहिले मी
खंत एक आहे
सूर्यप्रकाशात फिरणारा
अंधार मी आहे

                                     - प्रथमेश मेढेकर

Thursday, 19 November 2015

The complete truth

नग्नावतार संपूर्ण सत्य 


        आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा दिसणारा मनुष्य हा निश्चितच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसारखा दिसत नाही. त्याचे पोशाख हे त्याचे मूर्त स्वरूप दाखवतात, त्याची एक ओळख तयार करतात. जसे एखाद्या व्यक्तीची नक्कल करताना नकलाकार ती व्यक्ती जसे पोशाख घालते तसे पोशाख घालून नक्कल करते, कारण मूर्त रुपात पोशाख हि माणसाची ओळख असते.
पोशाखामुळे व्यक्तीचे एक चित्र माणसाच्या मनात तयार होते. सुट बूट घालणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन हा धोतर सदरा घातलेल्या माणसाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनापेक्षा निश्चितच वेगळा असतो.  पोशाख हा व्यक्तीची सर्वात पहिली ओळख करून देतो. म्हणजेच मनुष्य प्राणी ते व्यक्तिमत्व या दरम्यान असतात ते 'पोशाख'. मूर्त पोशाखासह मनुष्य घालत असतो अमूर्त पोशाख .
           जन्म हा नग्न अवतारात होतो. तेव्हा मनुष्याचे काही व्यक्तिमत्व नसते, त्याला कसलीच ओळख नसते.  मनुष्याचे नामकरण होता त्याला धर्माचा पोशाख घालायला मिळतो. हा पोशाख आपल्याला घातला जातो. एखाद्या व्यक्तीचे नाव माहित नसे पर्यंत तो आपल्यासाठी एक माणूस असतो पण नाव कळताच तो 'एक हिंदू व्यक्ती, एक मुसलमान माणूस, एक क्रिश्चन'  असे ते पोशाख आपली ओळख बनवते.  जातीचा पोशाख हा आडनावासह मिळतो. असेच विविध पोशाख माणूस एकावर एक घालत असतो. भाषा, स्थान, विचार, अभ्यास, जीवनपद्धत, आर्थिक स्थान, काम असे पोशाख माणसाला एक व्यक्तिमत्व प्राप्त करून देतात. यातील काही पोशाख हे इतर लोक आपणास घालतात तर काही आपण स्वतः परिधान करतो.
तर व्यक्तीची ओळख अशा मूर्त व अमूर्त पोशाखांवर अवलंबून असते. हे पोशाख बदलता देखील येतात म्हणजेच आज पहिलेला व्यक्ति उद्या वेगळा  दिसेल. आज पाहिलेल्या व्यक्ती ह्याने आपला धर्म बदलला, ज्ञानात भर केली, पैसे कमावले तर तो बदलाच ना! तर अशा पोशाखांना व्यक्तीची खरी ओळख समजून घेण्यासाठी कसे ग्राह्य धरता येईल! म्हणजेच मनुष्याने एकावर एक असे अनेक असत्यच (संपूर्ण सत्य नसलेले / अंतिम सत्य नसलेले) घातलेले असतात.
           तर अंतिम सत्य काय आहे?
नग्नावतार 
            वस्त्रहीन असणे.  अंगावर काहीही नसणे , हे एक प्रकारचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. कसलीच बंधने न जोपासता स्वतःचे 'स्व'पण जपणे. एकही पोशाख नाही. तेव्हा मनुष्य कशातही विभागाला जात नाही. ना देशसीमेत, ना धर्मात, ना सामाजिक स्थरात कशातच नाही. आपण घातलेल्या सर्व पोशाखांच्या आत आपण स्वतःला ओळखतो. स्वतःला वस्त्रहिन पाहिलेल असत. आपले संपूर्ण सत्य फक्त आणि फक्त आपल्यालाच माहित असते.
            तसेच सर्व अमूर्त पोषाखांच्या आत मनुष्य आहे नग्नावतारात, हेच अंतिम सत्य आहे. प्रत्येक मनुष्य हा सत्य लपवण्यासाठी पोशाख परिधान करून असतो. म्हणूनच माणसामाणसात विविधता आहेत. म्हणूनच माणूस भेद करू पाहतो. जर त्याने हे अंतिम सत्य मान्य केले कि जसा मी तसाच तो एक 'मनुष्य' आहे तर माणसांना समजून घेणे सोप्पे होईल . पोशाख परिधान करण्या अगोदर मनुष्य नग्न असतो आणि नग्न मनुष्य हा अमुक धर्माचा, जातीचा, श्रीमंत, गरीब, मराठी, गुजराती, पाकिस्तानी, विदेशी नसून फक्त माणूस असतो. माणुसकी पण हेच शिकवते हि प्रत्येक जण समान आहेत.
तर हे आपण लक्षात घेतले पाहिजे की …
मै भी नंगा तू भी नंगा तो आपस मै कायको दंगा। 

Sunday, 27 September 2015

OMG


परमेश्वर 

परमेश्वर म्हणजेच देव, अल्ला, God.  जे या विश्वात विविध धर्मांत विविध प्रकारे पूजले जातात. याच परमेश्वराने संपूर्ण सृष्ठीचा निर्माण केला आहे असे म्हणतात. आजच्या काळात परमेश्वरावर आस्था असणारे आस्थिक व आस्था नसणारे नास्थिक असे २ वर्ग माणसांमध्ये पहायला मिळतात,

 जन्मतः कोणी मानव हा आस्थिक किंवा नास्थिक नसतो. देव, आस्था अशा संकल्पना त्याच्यात रुजवल्या जातात. या संकल्पनांच्या रोपणाची खोलीच कदाचित मानवास आस्थिक किंवा नास्थिक बनवत असावी. आस्थिकाला व नास्थिकाला देवाबाबतच्या त्याच्या संकल्पना स्पष्ट असाव्या हि किमान अपेक्षा, कारण मानवास तोच देव माहित असतो जो त्याला त्याच्या पालकांनी लहानपणापासून दाखवला आहे, समजावला आहे. हा देव बहुतांश तोच देव आहे जो आपण मंदीर, मश्जीद, चर्च इ. मध्ये मूर्त रुपात पाहतो. अशा मूर्त स्वरूपाच्या अनेक आकृती आहेत. विविध धर्मानुसार, प्रांतानुसार ह्या आकृत्या वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी देव आपल्याला पाहायला मिळतो. मग देवाची ओळख ह्या विविध रुपात स्वीकारली गेली आहे. ह्या ओळखी निर्माण होण्याच्या अनेक कथा आहेत. ह्या रूपांना आकृतींना स्वीकृती देऊन देवाची ही एक संकल्पना जनसामान्यात रुजू केली गेलेली आहे.  
           देवाच्या अस्तित्वाला पुरावा काय? मानवाला देवाची गरजच काय? देव मानवासाठी काय करू शकतो? देव कुठे असतो? देव दिसतो कसा? असे अनेक प्रश्न मानवाला पडतात. यांची उत्तरे ज्याने त्याने स्वतःच्या सोयीनुसार बनवलेली आहेत. एकाचे सत्य हे दुसर्यासाठी असत्य ठरू शकते. म्हणून स्वानुभवावर काढलेली उत्तरे नेहमीच स्वत:चे समाधान करते. मी सुद्धा स्वतःच्या समाधानासाठी देवाची संकल्पना तयार केली आहे. काही प्रश्नांची उत्तरे बनवली आहेत. 
          देवाने आपल्याला बनवले आहे. एक शक्ती जिच्यातून सृस्तीची सुरुवात झाली. देव हि मूर्त गोष्ट नाही ती एक अदृश्य शक्ती आहे. ते  आपल्या अस्तित्वाच कारण आहे. Energy can be neither created nor be destroyed, but it transforms from one form to another. हेच वाक्य मराठीत 'आत्मा अमर आहे.' असे दिसते. यात कळून येईल जी आत्मा म्हणजेच Energy. मानव म्हणजे देह, आत्मा हि ती व्यक्ती. ती नष्ट किंवा उत्पादित होत नाही. पण मग यासर्वांपुढे यांची निर्मिती करणारी शक्ती म्हणजे पर्मेश्वर. 
         माणूस हा परावलंबी सजीव आहे. त्याने आपल्या उदर निर्वाहासाठी अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे. मानसिक आधार देव देतो. लहानपणी सायकल चालवताना मागून गुपचूप बाबा सायकल सोडून द्यायचे आणि बाबांनी सायकल पकडली आहे या विश्वासावर दुचाकी सायकल अगदी सहज चालवता यायची. हा विश्वास आपल्याला पडायला देत नाही. हा विश्वास म्हणजे परमेश्वर. परमेश्वर माणसाच्या मेहनतीला न्याय मिळवून देऊ शकतो. एखादा व्यक्ति सत्कर्म करात असेल तर त्याचा मोबदला हा त्याला मिळतोच. 

         देव कुठे नसतो? देव हा प्रत्येक अणु मध्ये असतो. देव कणाकणात असतो। परमेश्वर दिसत नाही तो फक्त अनुभवता येतो. कर्माचे फल मिळणे,  boomerang theory, law of attraction अशा सर्व संकल्पना या न्यायनिवाड़ा करणाऱ्या परमेश्वराच्या संकल्पनेचेच एक घटक आहेत. 
        मुळात  देव म्हणजे काय , तर ते फक्त एक नाव आहे. आता प्रश्न आहे तो नेमक हे नाव कोणाचे ?
आपल्याला विविध लोक विविध नावांनी संबोधतात जस आई साठी आपल्याला 'बाळा', मित्र 'पक्या', कोणी 'राजू' , कोणी 'शोना' बोलत. असा विविध लोकांसाठी आपण वेगवेगळ्या नावांचा भडीमार करून घेतो. एखाद्या वस्तू प्रमाणे 'समानार्थी नावे पण वस्तू तीच'. परमेश्वरालाही ठिकठिकाणचे लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. परमेश्वर हि एखादी वस्तू, व्यक्ती नसून ती एक संकल्पना आहे. ठिकठिकांणच्या लोकांनी या संकल्पनेला वेगवेगळी नावे दिली आहेत. नियती, कर्मा, मोक्ष्य आशा संकल्पना परमेश्वराच्या कृत्यांचाच एक भाग आहे.



         म्हणून देवाचे अस्तित्व हे मानवाच्या विश्वासावर  अवलंबून आहे.