नग्नावतार संपूर्ण सत्य
आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा दिसणारा मनुष्य हा निश्चितच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसारखा दिसत नाही. त्याचे पोशाख हे त्याचे मूर्त स्वरूप दाखवतात, त्याची एक ओळख तयार करतात. जसे एखाद्या व्यक्तीची नक्कल करताना नकलाकार ती व्यक्ती जसे पोशाख घालते तसे पोशाख घालून नक्कल करते, कारण मूर्त रुपात पोशाख हि माणसाची ओळख असते.
पोशाखामुळे व्यक्तीचे एक चित्र माणसाच्या मनात तयार होते. सुट बूट घालणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन हा धोतर सदरा घातलेल्या माणसाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनापेक्षा निश्चितच वेगळा असतो. पोशाख हा व्यक्तीची सर्वात पहिली ओळख करून देतो. म्हणजेच मनुष्य प्राणी ते व्यक्तिमत्व या दरम्यान असतात ते 'पोशाख'. मूर्त पोशाखासह मनुष्य घालत असतो अमूर्त पोशाख .
जन्म हा नग्न अवतारात होतो. तेव्हा मनुष्याचे काही व्यक्तिमत्व नसते, त्याला कसलीच ओळख नसते. मनुष्याचे नामकरण होता त्याला धर्माचा पोशाख घालायला मिळतो. हा पोशाख आपल्याला घातला जातो. एखाद्या व्यक्तीचे नाव माहित नसे पर्यंत तो आपल्यासाठी एक माणूस असतो पण नाव कळताच तो 'एक हिंदू व्यक्ती, एक मुसलमान माणूस, एक क्रिश्चन' असे ते पोशाख आपली ओळख बनवते. जातीचा पोशाख हा आडनावासह मिळतो. असेच विविध पोशाख माणूस एकावर एक घालत असतो. भाषा, स्थान, विचार, अभ्यास, जीवनपद्धत, आर्थिक स्थान, काम असे पोशाख माणसाला एक व्यक्तिमत्व प्राप्त करून देतात. यातील काही पोशाख हे इतर लोक आपणास घालतात तर काही आपण स्वतः परिधान करतो.
तर व्यक्तीची ओळख अशा मूर्त व अमूर्त पोशाखांवर अवलंबून असते. हे पोशाख बदलता देखील येतात म्हणजेच आज पहिलेला व्यक्ति उद्या वेगळा दिसेल. आज पाहिलेल्या व्यक्ती ह्याने आपला धर्म बदलला, ज्ञानात भर केली, पैसे कमावले तर तो बदलाच ना! तर अशा पोशाखांना व्यक्तीची खरी ओळख समजून घेण्यासाठी कसे ग्राह्य धरता येईल! म्हणजेच मनुष्याने एकावर एक असे अनेक असत्यच (संपूर्ण सत्य नसलेले / अंतिम सत्य नसलेले) घातलेले असतात.
तर अंतिम सत्य काय आहे?
नग्नावतार
वस्त्रहीन असणे. अंगावर काहीही नसणे , हे एक प्रकारचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. कसलीच बंधने न जोपासता स्वतःचे 'स्व'पण जपणे. एकही पोशाख नाही. तेव्हा मनुष्य कशातही विभागाला जात नाही. ना देशसीमेत, ना धर्मात, ना सामाजिक स्थरात कशातच नाही. आपण घातलेल्या सर्व पोशाखांच्या आत आपण स्वतःला ओळखतो. स्वतःला वस्त्रहिन पाहिलेल असत. आपले संपूर्ण सत्य फक्त आणि फक्त आपल्यालाच माहित असते.तसेच सर्व अमूर्त पोषाखांच्या आत मनुष्य आहे नग्नावतारात, हेच अंतिम सत्य आहे. प्रत्येक मनुष्य हा सत्य लपवण्यासाठी पोशाख परिधान करून असतो. म्हणूनच माणसामाणसात विविधता आहेत. म्हणूनच माणूस भेद करू पाहतो. जर त्याने हे अंतिम सत्य मान्य केले कि जसा मी तसाच तो एक 'मनुष्य' आहे तर माणसांना समजून घेणे सोप्पे होईल . पोशाख परिधान करण्या अगोदर मनुष्य नग्न असतो आणि नग्न मनुष्य हा अमुक धर्माचा, जातीचा, श्रीमंत, गरीब, मराठी, गुजराती, पाकिस्तानी, विदेशी नसून फक्त माणूस असतो. माणुसकी पण हेच शिकवते हि प्रत्येक जण समान आहेत.
तर हे आपण लक्षात घेतले पाहिजे की …
मै भी नंगा तू भी नंगा तो आपस मै कायको दंगा।




